राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी: शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात आजपासून 85 वर्षा पुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची जबाबदारी बजावण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना 18 ते 20 अशी तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासनाची व संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांचे लगबग पाहायला मिळत आहे. त्यामुळे 18, 19, 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत शिक्षकांना निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना देण्याच्या राज्य सरकारच्या वतीने शिक्षण आयुक्तांना विनंती पत्राद्वारे देण्यात आला आहे.
पत्रात काय आहे नेमका मजकूर?
उपरोक्त संदर्भीय पत्रांमुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 18, 19 व 20 नोव्हेंबर 2024 रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. तसेच सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 राज्यात सुरळीतपणे पार पडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणे बाबत आपण आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात ही विनंती, असे आदेश राज्य सरकारने उपसचिव तुषार महाजन यांच्या पत्राद्वारे शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहे.
निवडणूक कर्तव्यावर अनेक शिक्षक आहेत तसेच अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र सुद्धा ठरवण्यात देण्यात आले या सगळ्याचा विचार करून 18, 19, 20 नोव्हेंबर या तीन दिवशीच्या शाळांना शाळा भरवणे शक्य नसेल त्या सर्वांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.